मुंबई : विशेष प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासून अस्थिर असलेल्या शेअर बाजारात या आठवड्यात चांगली वाढ पाहायला मिळाली. संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह संचारलेला असताना, त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. दिवाळीपूर्व आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी अनुभवायला मिळाली. या तेजीमुळे देशातील अव्वल १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी वाढ नोंदवली आहे.
आकडेवारीनुसार, या एका आठवड्यात टॉप १० मधील ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकूण २,१६,५४४.२९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे ३ कंपन्यांच्या बाजार मूल्याला ६१,७९८.२३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, देशातील आयटी कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
बाजारातील या वाढीला देशात आलेल्या दोन मोठ्या आयपीओला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या खरेदीमुळे मोठा आधार मिळाला आहे. आठवड्याभरात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १.७५ टक्क्यांनी तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टी सुमारे २ टक्क्यांनी वधारला.
रिलायन्स इंडस्ट्रीजने या आठवड्यात सर्वाधिक फायदा मिळवत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स, एचयूएल, इन्फोसिस आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.

