पुणे : प्रतिनिधी
लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आषाढात पंढरपूरला जातात. टाळ-मृदंग,भगवी पताका आणि मुखी विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा विठूरायाच्या दर्शनासाठी जातो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत जातात. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. यंदा ८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता माऊलींची पालखी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आळंदीहून प्रस्थान करणार आहे. तर २४ जुलै रोजी हे वैष्णवांचे रिंगण पंढरपूर नगरीत दाखल होईल. दरम्यान यंदाच्या १७ दिवसांच्या या पायी वारीत भक्तिभावाचा परमोच्च बिंदू ठरणारी ४ गोल आणि ३ उभी रिंगणे होणार आहेत. मुख्य आषाढी एकादशीचा सोहळा २५ जुलै रोजी साजरा होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी दिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम कुठे होणार? याबाबत बराच गोंधळ उडाल्यानंतर अखेर आळंदी देवस्थानने परंपरेनुसार भवानी पेठेतच होणार आहे. आज देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केले आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करून, परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणा-या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.

