अमरोहा : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे फास्ट फूड खाण्याच्या आवडीमुळे एका अकरावीत शिकणा-या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. चाऊमीन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर यांसारख्या फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे या विद्यार्थिनीचे आतडे पूर्णपणे खराब झाले होते आणि आतड्यांना छिद्र पडले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अहाना (१६) ही अमरोहा शहरातील शेतकरी मन्सूर खान यांची मुलगी होती. ती शहरातील हाशमी गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अहानाला फास्ट फूड खाण्याचे व्यसनच जडले होते. घरच्यांनी वारंवार मनाई करूनही ती लपून-छपून चाऊमीन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर खात असे. सप्टेंबर महिन्यापासून तिची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली आणि तिच्या पोटात सतत तीव्र वेदना होऊ लागल्या.
अहानाचा मामा गुलजार खान यांनी सांगितले की, डॉक्टरांनी फास्ट फूडलाच आतड्यांच्या या गंभीर अवस्थेसाठी जबाबदार धरले आहे. एका हुशार विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

