अहमदपूर : रविकांत क्षेत्रपाळे
तालुक्यात पावसाळयात पाऊस खूप कमी पडला आहे. मात्र याच पावसावर सद्या या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विंधन विहिर, नळाचे पाणी, आड, विहिरीला पाणी आहे. या पाण्याचा जास्त उपसा होत नसल्याने हे सुरू आहेत. या पाण्यावर तालुक्यातील किमान अडीच हजार घरकुलाचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागात ज्यांच्या घरकुलाचे बांधकाम चालू आहे त्यांनी आजपर्यंत आम्हाला पाण्याची अडचण आहे, असे काही सांगितले नसल्यामुळे ही सर्व बांधकामे दुष्काळ असूनही चालू आहेत. दुष्काळ व पाणीटंचाईचा सद्यातरी बांधकामांना अडचण नसल्याचे सांगितले.
शहरासह ग्रामीण भागात बांधकामे फार क्वचित प्रमाणात सुरू आहेत. बांधकामधारकांनी बांधकाम करायचे म्हणून स्वत: विंधन विहीरी घेतलेल्या आहेत. या पाण्यावर त्यांचे बांधकाम सुरू आहे. सुरु असलेल्या बांधकामांच्या ठिकाणचे पाण्याचे स्त्रोत हे खाजगी स्वरूपाचे आहेत. सध्या तालुक्यामध्ये पाणी थोड्याफार प्रमाणात असल्यामुळे ग्रामीण भागातील घरकुलाची बांधकामे सुरु असून अद्यापही कुठल्याही गावातील नागरिकांनी पाणी नसल्यामुळे घरकुलाचे बांधकाम बंद करण्याची वेळ येणार नसल्याचे सांगत आहेत. कोणत्याही घरकुलाचे बांधकाम करण्यात येणा-या नागरिकांनी पाण्याची आवश्यकता आहे अशी मागणी केल्यानंतर घरकुलधारकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
















