निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा शहरासह तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मात्र, एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची चिंता वाढत असताना दुसरीकडे घरकुलांसह इमारतींची बांधकामे जोमात सुरू आहेत. शहरात २१७ घरकुले, तर ग्रामीण भागात मंजूर १६ हजार ६५० घरकुलांपैकी ११ हजार ४५५ घरकुलांची कामे सुरू आहेत. बांधकामांसाठी खासगी पाण्याचा वापर होत असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन बांधकामांवर निर्बंध घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र, वरिष्ठांचे आदेश नसल्याने प्रशासनाने अद्याप बांधकामे बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
बांधकामांसाठी खासगी पाण्याचा वापर करा
दुष्काळामुळे बांधकामे बंद करण्याच्या सूचना नसल्याने परवाने दिले जात आहेत. बांधकामांसाठी नगरपालिकेचे पाणी वापरू नये, खासगी पाण्याचा वापर करावा. वरिष्ठांचे आदेश आल्यास बांधकामे बंद केली जातील, असे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी ‘एकमत’ शी बोलताना सांगितले.
















