लातूर : एजाज शेख
महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळामुळे पाणीटंचाई आणि भूजल पातळी खालवल्याने राज्य सरकारने रस्ते व सरकारी बांधकाम प्रकल्पांना वर्षभर स्थगिती दिली आहे. याचा थेट फटका गवंडी, सेंट्रिंग कामगार, मजूर यांना बसला आहे. लातूर जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील ५ लाखांहून अधिक घटकांवर बेकारीची कु-हाड कोसळली आहे. कामे बंद झाल्याने कामगारांसमोर रोजगाराचे मोठे संकट उभे राहिले आहे.
लातूर जिल्हा त्यातल्या त्यात लातूर शहर झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. दुष्काळाचे सावट असल्याने ग्रामीण भागात त्याची अधिक तीव्रता जाणवत आहे. शेतात पीक नाही, विहिरीत पाणी नाही, हाताला काम नाही, रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाल्याने ग्रामस्थांनी शहराकडे स्थलांतर सुरु केले आहे. परंतू, दुष्काळामुळे शहरी व ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने नव्या बांधकामांवर निर्बंध आणि पाणीकपात लागु करण्यात आली आहे. त्याचा परिणाम रोजंदारीवर जगणारे सेंट्रिंग कामगार, गवंडी आणि मजुरांच्या हाताला काम मिळणे बंद झाले आहे. खरे तर बांधकाम म्हटले की, केवळ इमारात बांधकाम मजूरच आपल्या डोळ्या समोर येतात. परंतु, बांधकाम क्षेत्राशी संबंधीत विविध घटकांमध्येही लाखो लोकांचा समावेश आहे. अगदी वीटभट्टी, वाळू विक्री, खडी विक्री, पाणी टँकर, सेंट्रींगचे साहित्य विके्रते, बांधकामाचे साहित्य विके्रते, रंगकाम करणारे पेंंटर अशा विविध पुरक व्यवसायांचा व त्यात काम करणा-या मजुरांचा मोठा वर्ग आहे. केवळ बांधकामावर निर्बंध घातल्याने लाखो लोकांच्या तोंडचा घास बंद होतो.
५० टक्के बांधकामे बंद
नव्या बांधकामांवर निर्बंध आणि पाणीकपात लागु केल्याने लातूर शहरातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक बांधकामे बंद पडली आहेत. या बांधकामांवर काम करणारे लाखो मजूर बेरोजगार बनले आहेत. एवढेच नव्हे तर गंजगोलाई, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेणापूर नाका, कव्हा नाका येथे मजूरीचे काम मिळण्यासाठी थांबणा-या मजूरांचीसुद्धा संख्या घटली आहे. मजूरीच मिळत नसल्याने बांधकाम मजूरांनी इतर कामे शोधून रोजीरोटीची सोय करीत आहेत. परिणामी बांधकामाचे टोपले, टिकाव, खोरे, चाळण्या भाड्याने देऊन चार पैसे कमावणा-यांचीही रोजी बंद पडली असल्याची माहिती बांधकाम व्यवसायिकांने दिली.
















