लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी, तसेच कामानिमित्त येणा-या नागरीकांना पिण्यासाठी थंडगार पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून पैसे खर्च करून वॉटर फिल्टर यंत्रणा गेल्या कांही महिण्यापूर्वी बसवली होती. सदर यंत्रणा बंद पडली असून नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे खर्च करून बाहेरून पाणी आणावे लागत आहे. एैन उन्हाळयाच्या दिवसात नागरीकांचा घसा कोरडा पडत असताना जिल्हा परिषदेची पाण्याची बसवलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
लातूर जिल्हा परिषदेत जिल्हाभरातून नागरीक कामा निमित्त येतात. तसेच जिल्हा परिषदेत नुतन पदाधिकारी निवडूण आल्याने त्यांना भेटण्यासाठी व कामे मार्गी लावण्यासाठी नागरीकांची दररोज ये-जा असते. सध्या उन्हाळयाचे दिवस असून जिल्हयातील तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सीअसच्या वर गेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागही नागरीकांना सतत पाणी पिण्याचे व सावलीचा आधार घेण्याचा सल्ला देत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषदेत बसवलेले वॉटर फिल्टर बंद पडले आहे.
या वॉटर फिल्टरच्या बाजूला पाणी पिण्यासाठी बसवलेला ग्लासही गायब झाला आहे. जिल्हा परिषदेत सध्या सभापतींच्या दालनाचे काम सुरू असल्याने बसण्यासाठीचे सोफेही या वॉटर फिल्टरच्या समोरच ठेवले आहेत. नागरीकांचे सहज लक्ष त्या वॉटर फिल्टरकडे जाते. जेंव्हा वॉटर फिल्टरच्या नळाला नागरीक हात लावून तोटी दाबतात. मात्र त्या नळातून पाणी न आल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. याकडे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासन गांभीयाने पाहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

