नागपूर : प्रतिनिधी
‘अॅक्युट एन्सेफलायटिस सिंड्रोम’ (एईएस) या मेंदूज्वराच्या आजाराचा शहरात शिरकाव झाला आहे. या आजाराच्या आठ रुग्णांची नोंद झाली असून, यातील पाच रुग्ण हे मध्यप्रदेशातील, दोन रुग्ण नागपूर शहर व एक नागपूर ग्रामीणमधील आहेत. मेंदूशी संबंधित या आजाराविषयी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, केरळमध्ये या आजाराने आतापर्यंत १९ जण मृत्युमुखी पडले आहेत.
नागपूर शहरात या रुग्णांची नोंद होताच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात शहरात आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.
केरळमध्ये ‘अमीबिक इंसेफेलायटिस’ या दुर्मिळ आणि प्राणघातक आजाराने संक्रमित झालेल्या रुग्णांच्या मृत्युंची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षी केरळमध्ये अमीबिक इंसेफेलायटिसचे ६१ रुग्ण आढळले, ज्यामध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये या संसर्गाचे प्रमाण जास्त होते, परंतु आता संपूर्ण राज्यात अमीबिक इंसेफेलायटिसचे रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये ३ महिन्यांच्या बाळापासून ते ९१ वर्षांच्या वृद्धापर्यंत समावेश आहे.
अमीबिक इंसेफेलायटिस म्हणजे काय?
हा आजार नेगलेरिया फाउलेरी नावाच्या सूक्ष्मजीवामुळे होतो. हा सूक्ष्मजीव दूषित गोड्या पाण्यात, जसे की तलाव, नद्या, विहिरी आणि क्लोरीन नसलेल्या पाण्यात आढळतो. जेव्हा एखादी व्यक्ती दूषित पाण्यात पोहते किंवा डुबकी मारते, तेव्हा हा अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. शरीरात शिरल्यानंतर, हा अमीबा थेट मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूच्या पेशींवर हल्ला करतो. यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात.