नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणा-या अशोक खरात प्रकरणाने आता मोठे वळण घेतले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष तपास पथकाकडून नुकतीच त्यांची सविस्तर चौकशी करण्यात आल्या आहेत.
अशोक खरात याच्यावर मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचे गंभीर आरोप आहेत. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, या कथित रॅकेटमधून ७० कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पैशांचे व्यवहार लपवण्यासाठी अनेक बेनामी बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही धागेदोरे रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचल्याने तपास यंत्रणांनी त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या व्यवहारांमध्ये त्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध होता का, याचा आता सखोल तपास सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी विशेष तपास पथकाने नाशिकमध्ये रूपाली चाकणकर यांची साडेपाच तास चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. काही आर्थिक व्यवहार, संस्थांशी संबंधित नोंदी तसेच संपर्कांची माहिती तपास अधिका-यांनी पडताळून पाहिल्याचे सांगितले जात आहे. एसआयटी चौकशीनंतर लगेचच ईडीने हालचाली सुरू केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. आता मनी लाँड्रिंग, आर्थिक गैरव्यवहार आणि पैशांचा बेकायदेशीर वापर या सर्व बाबींवर स्वतंत्र तपास केला जाणार असल्याची चर्चा आहे.
तपास यंत्रणांच्या रडारवर ‘शिवनिका’ नावाची संस्था देखील आली आहे. या संस्थेमधील रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेची माहिती तपासली जात आहे. अशोक खरातने कथितरीत्या गोळा केलेल्या पैशांचे व्यवहार या संस्थेमार्फत झाले का, तसेच आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी काही मदत करण्यात आली का, याचा तपास सुरू आहे. याशिवाय, या व्यवहारांचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांपर्यंत पोहोचतात का, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ईडीच्या पुढील कारवाईकडे लक्ष
राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात या प्रकरणाने मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. केंद्रीय यंत्रणेने थेट या तपासात प्रवेश केल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. चौकशीत ठोस पुरावे मिळाल्यास रूपाली चाकणकर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

