नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतातील बा वायू प्रदूषणामुळे २०२२ मध्ये सुमारे ३० लाख कोटींचा फटका बसला आहे. हे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ९.५ टक्क्यांच्या बरोबरीचे आहे. ‘लॅन्सेट’ काऊंटडाऊन या आंतरराष्ट्रीय आणि बहुअनुशासनात्मक संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. २०२२ मध्ये वायू प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या कोव्हिडमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपेक्षा खूप जास्त होती.
१७ लाख लोकांचा मृत्यू : जागतिक आरोग्य संघटनेच्या जवळच्या समन्वयाने काम करणा-या आरोग्य आणि हवामान बदलावरील लॅन्सेट काऊंटडाऊननुसार, २०२२ मध्ये भारतात २.५ या अतिसूक्ष्म कणरूपी प्रदूषकाच्या संपर्कात आल्याने १७ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मात्र संबंधित मृत्यूंच्या मोठ्या आकड्यांचे खंडन केले आहे.
२०२२ मध्ये भारतातील घरांमध्ये प्रदूषणकारी इंधनाच्या वापरामुळे होणा-या वायुप्रदूषणामुळे प्रति एक लाख लोकांमागे ११३ मृत्यू झाले. घरातील वायुप्रदूषणामुळे होणारे मृत्यू दर शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात जास्त होते (ग्रामीण भागात प्रति एक लाखमागे १२५ आणि शहरी भागात ९९), असे अहवालात म्हटले आहे.
उष्णतेचा सर्वाधिक त्रास
अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतातील लोकांना सरासरी १९.८ दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. यापैकी ६.६ दिवसांचा सामना हवामान बदलाशिवाय अपेक्षित नव्हता. १९९०-१९९९ च्या तुलनेत, २०२४ मध्ये लोकांना सरासरी ३६६ अधिक तास अशा वातावरणीय उष्णतेचा सामना करावा लागला आहे.
















