अहमदपूर : प्रतिनिधी
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, कामगार या गोरगरीब बांधवांची दिवाळी ही सुखकर व्हावी, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने दिवाळीच्या सणामध्ये आनंदाचा शिधा व आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते येथील एम.आय.डी.सी. परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणा-या शेतकरी कुटुंबांना, कामगार कष्टकरी यांना हा दिवाळीचा सण आनंदाने व समाधानाने साजरा करता यावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी दिवाळीतील आनंदाचा शिधा आणि आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी सभापती अॅड.आर.डी. शेळके , नवनाथ भोसले, जिल्हा परिषद सदस्या शितल खोमणे, अॅड. गणेश गोमचाळे, प्रिती कोळी, अॅड. रेखा भोसले, पं. स. सदस्य सुधीर गोरटे, जि.प.सदस्य देवानंद मुळे, नगरसेवक राहुल शिवपुजे, सावन कदम, गोपीनाथ जायभाये, दीपक हालगे, बाबुराव शेळके, राजीव खंदाडे, राजेंद्र कांबळे , काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.
















