लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यात एकुण ६० महसूल मंडळं आहेत. या सर्वच महसूली मंडळांत गतवर्षी अतिवृष्टीने शेतक-यांचे खुप मोठे नूकसान केले होते. खरीप हंगामात शेतक-यांच्या हाती काहींच लागले नाही. त्यामुळे किमान पीकविमा तरी मिळेल या आशेपोटी जिल्ह्यातील शेतक-यांनी पीकविमा भरला. आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने लातूर जिल्ह्यातून ११८ कोटी रुपये पिकविम्याची रक्कम जमा केली. परंतु, पीकविमा ६० महसूल मंडळातील शेतक-यांना देण्याऐवजी केवळ ४ महसूल मंडळात १९ कोटी रुपयांचा पीकविमा वाटला. ५६ महसूल मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना वा-यावर सोडून आयसीआयसी लोबार्ड कंपनीने शेतक-यांचेच १०० कोटी रुपये लुबाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
लातूर जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ७३९ एवढे खातेदार शेतकरी आहेत. ४ लाख ५४ हजार ४०० हेक्टर क्षेत्र होते. खरीप-२०२५ च्या पीक विम्यासाठी ७ लाख १२ हजार शेतक-यांनी आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले होते. परंतू, या कंपनीने पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाचे वजन मीसमॅच झाले, रँडम नंबर योग्य वापरला नाही, प्लॉट चुकीचे निवडले, मळणी व्यवस्थित केली नाही, चुकीचे वजन घेतले, पीक कापणी प्रयोग झाले तिथे पीकच नव्हते, असे थातूरमातूर, बालीश आणि बोगस कारणे देत लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप-२०२५ चा पीक विमा नाकारला आहे.
आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने थातूरमातूर, बालीश आणि बोगस कारणे देत लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप-२०२५ चा पीक विमा नाकारला आहे. त्यामुळे हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. राज्य सरकारने अशावेळी शेतक-यांच्या बाजुने खंबीरपणे उभे राहाण्याऐवजी शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. त्यामुळे शेतक-यांमधुन प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे शेतक-यांमधील असंतोष वाढत आहे. तर दुसरीकडे आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीचे अपील जिल्हा स्तरीय समिती आणि राज्य तांत्रिक समितीनेही फेटाळून लावले. त्यामुळे या कंपनीने काही तरी केल्याचे दाखवण्यासाठी लातूर जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि औसा तालुक्यातील भादा, बेलकुंड आणि जळकोट तालुक्यातील घोणसी या ४ महसूल मंडळातील शेतक-यांना विमा मंजूर केला. इतर महसूल मंडळातील पीक नुकसानीची दखलच घेण्यात आली नाही. याला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय आणि आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी जबाबदार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे
प्रचंड नूकसान होऊनही आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने लातूर जिल्ह्यातील ५६ महसूल मंडळातील शेतक-यांना पीकविमा नाकारला. खरे तर लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस स्वत: लातूर जिल्ह्यात पाहाणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना प्रति हेक्टरी १७ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. पीकविमा कंपनीने तर पीकविमा नाकारला आता किमान मुख्यमंत्र्यांनी तरी त्यांचे स्वत:चे आश्वासन पाळावे, शेतक-यांना नूकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करुन, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला आहे.
















