मुंबई : प्रतिनिधी
सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील आरोप मागे घेण्याच्या मुद्यावर राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. आर्थिक फसवणूक केल्याच्यं गौतम अदानींवरील अमेरिकेतील आरोपांना मागे घेण्यात आले आहे. यावरून आता पुन्हा एकदा काँग्रेसने आक्रमक होत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
गौतम अदानींवर अमेरिकेत २६५ दशलक्ष डॉलर्सची कथित आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. पण आता अमेरिकेने हा खटला मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते एका पोस्टमध्ये म्हणाले, गुंतवणुकीच्या वाटाघाटींनंतर अमेरिकन अधिकारी गौतम अदानी यांच्यावरील आरोप मागे घेण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या ख-या असतील, तर त्यामुळे क्रोनी कॅपेटलिझमची धोकादायक जागतिक व्याप्ती उघड होते.
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असे वचन देणा-या सरकारने उत्तरदायित्वाला केवळ एक प्रसिद्धीचा खेळ बनवले आहे. अनेक वर्षे, भारतात अदानी यांच्यावर उपस्थित केलेला प्रत्येक प्रश्न ‘राष्ट्रविरोधी’ म्हणून फेटाळला जात होता. आज जग तेच प्रश्न विचारत आहे, जे विरोधी पक्ष अनेक वर्षांपासून विचारत आहेत: एका उद्योगपतीचे इतक्या आक्रमकपणे संरक्षण कोण करते? आणि का? ही अशा व्यवस्थेची गोष्ट आहे जिथे सत्ता विशेषाधिकारांचे रक्षण करते, तर सामान्य नागरिक न्याय, नोकरी आणि जगण्यासाठी संघर्ष करत आहेत, असे ते म्हणाले.
एक मोठी रक्कम अमेरिका सरकार अदानीकडून कॉम्प्रोमाईझ अमाऊंट म्हणून घेणार आहे. ठीक आहे. पण आणखी काय काय गोष्टी आमचे साहेब त्यांच्या अदानी नावाच्या मित्रासाठी कॉम्प्रोमाईझ करणार? याचा विचार धडकी भरविणारा आहे. काही जणांचा देशद्रोह जणू सगळ्या भारतीयांनी स्वीकारायचा असे झालेय, असे त्यांनी म्हटले आहे.
…. है तो मुमकिन है : असीम सरोदे
दुसरीकडे, विधिज्ञ असीम सरोदे यांनीही या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गौतम अदानी याच्याविरुद्धचे खटले युनायटेड स्टेट्स (अमेरिकन) सरकारच्या दोन प्रमुख संस्था यू. एस. डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (फौजदारी खटल्याचे प्रतिनिधित्व करणारी संस्था) आणि यू. एस. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (दिवाणी खटला हाताळणारी संस्था) यांच्या द्वारे दाखल करण्यात आले. साधारणत: अमेरिकेत असे खटले परत घेतले जात नाहीत. पण आता अमेरिका हे आरोप मागे घ्यायला तयार झाल्याचे वाचले आणि लक्षात आले कि ‘….. है तो मुमकिन है.’

