अमृतसर : अमृतसरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या २ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. आरोपींकडून एक गाडीही जप्त करण्यात आली आहे. या संदर्भात सुरक्षा यंत्रणा दोघांची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही व्यक्ती पाकिस्तानच्या कसूर परिसरात दुकानांवर विविध वस्तू पुरवण्याचे काम करत होते. याच दरम्यान ते आपल्या खाजगी गाडीतून सीमा ओलांडून भारतीय हद्दीत पोहोचले, जिथे बीएसएफ जवानांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. अटक केलेल्या नागरिकांची ओळख मोहम्मद सलीम, नजीर अहमद यांचा मुलगा (६०), रा. नास्टर कॉलनी, फिरोजपूर रोड, लाहोर आणि अमीर नवाज, मोहम्मद नवाज यांचा मुलगा(४०), रा. जसहीन टाऊन, गज्जी रोड, लाहोर अशी झाली आहे.
बीएसएफ प्रत्येक बाजूने तपास करत आहे
बीएसएफ अधिका-यांनी शून्य रेषेवर पाकिस्तानी रेंजर्सनाही या संदर्भात माहिती दिली आहे. सध्या दोन्ही आरोपींची अमृतसर सेक्टरमध्ये बीएसएफ अधिकारी कसून चौकशी करत आहेत. हे चुकून भारतात घुसले तर नाहीत ना, याचीही अधिकारी चौकशी करत आहेत.
















