नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केल्यामुळे तेलाची आयात थांबली आहे, यामुळे आता भारतात तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. भारत आता नवीन तेल स्त्रोतांचा शोध घेत आहे. दरम्यान, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला हा देश एक महत्त्वपूर्ण आधार म्हणून पुढे आला आहे. सुमारे पावणे तीन कोटी लोकसंख्या असलेला व्हेनेझुएला, सौदी अरेबिया आणि अमेरिकेसारख्या देशांनाही मागे टाकून, आता भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार बनला आहे.
व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज पुढील आठवड्यात भारताला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये तेल पुरवठा आणि ऊर्जा सहकार्यावर चर्चा होईल. भारत अमेरिकेचा एक मजबूत भागीदार आहे. भारताला आवश्यक तेवढी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार असल्याचे, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो म्हणाले.
व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. भारत आपल्या तेलाच्या गरजांपैकी बहुतांश तेल परदेशातून खरेदी करतो. त्यामुळे, भारताला आता कोणत्याही एका देशावर अवलंबून राहायचे नाही आणि विविध देशांकडून आपली तेल खरेदी वाढवत आहे.केप्लरच्या माहितीनुसार, २० मे पर्यंत व्हेनेझुएला भारताला दररोज अंदाजे ४,१७,००० बॅरल कच्चे तेल पाठवत होता. एप्रिलमध्ये हा आकडा दररोज २,८३,००० बॅरल होता. यापूर्वी भारताने सलग नऊ महिने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी केले नव्हते. अमेरिकेने काही निर्बंध शिथिल केल्यानंतर पुरवठा पुन्हा सुरू झाला.
रशिया आणि संयुक्त अरब
अमिरात दुस-या क्रमांकावर
भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसह अनेक तेल शुद्धीकरण कंपन्या व्हेनेझुएलाचे स्वस्त अधिक प्रमाणात खरेदी करत आहेत. मे महिन्यात भारताची एकूण तेल आयात ८ टक्क्यांनी वाढून दररोज ४९ लाख बॅरल झाली. मे महिन्यात रशियाकडून भारताने सर्वाधिक तेल आयात केले, ते अंदाजे दररोज १९.८३ लाख बॅरल होते. दुस-या क्रमांकावर संयुक्त अरब अमिरात आणि तिस-या क्रमांकावर व्हेनेझुएला आहे. दरम्यान, सौदी अरेबियाचा तेल पुरवठा दररोज ३,४०,००० बॅरलपर्यंत कमी झाला.
भारताने अंगोला आणि अमेरिकेकडूनही तेल खरेदी केले आहे. यापूर्वी भारताने इराणकडूनही मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले होते. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करणा-या देशांवर निर्बंध लादण्याची धमकी दिली होती. यानंतर भारताने इराणकडून होणारी तेल खरेदी कमी केली.
















