वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेशी पडद्यामागून सुरू असलेल्या सीजफायरच्या (युद्धबंदी) वाटाघाटींदरम्यान, इराणकडून इस्रायल आणि खाडी देशांवर अचानक मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला होऊ शकतो, असा खळबळजनक अंदाज इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी वर्तवला आहे. जेरूसलम पोस्टने यासंदर्भातील वृत्त दिले असून यामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे.
इराणकडून कोणत्याही क्षणी कूटनीतिक प्रयत्न अपयशी ठरण्यापूर्वीच हल्ला केला जाऊ शकतो, असा इस्रायली सुरक्षा अधिका-यांचा होरा आहे. या संभाव्य धोक्याची तुलना अमेरिकेच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ आणि इस्रायलच्या ‘ऑपरेशन रोरिंग लायन’ या लष्करी मोहिमांच्या सुरुवातीच्या अत्यंत आक्रमक टप्प्यांशी करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्र्यांकडून तातडीची आढावा बैठक
या वाढत्या धोक्याची दखल घेत इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज आणि आयडीएफच्या वरिष्ठ लष्करी अधिका-यांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेची उच्चस्तरीय समीक्षा केली आहे. इराणच्या संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी इस्रायली हवाई दल आणि गुप्तचर यंत्रणा अमेरिकन लष्करी अधिका-यांच्या थेट संपर्कात आहेत. आयडीएफचे लेफ्टिनेंट जनरल ईयाल जमीर हे संभाव्य हल्ल्याला संयुक्त प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेशी सातत्याने समन्वय साधत आहेत.
ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात मतभेद
इराणच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात काही धोरणात्मक मतभेद असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, असे असले तरी दोन्ही देशांच्या सैन्याची संयुक्त तयारी पूर्ण आहे. गेल्या महिनाभरात अमेरिकेकडून इस्रायलला होणा-या लष्करी पुरवठ्यात प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. दोन्ही देशांनी मिळून क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर अपग्रेड केले आहे, जेणेकरून इराणचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करता येतील.
ट्रम्प यांचा कडक इशारा
इराणला कोणत्याही परिस्थितीत अणू बॉम्ब बनवू देणार नाही. इराणकडे असलेला ९०० पाउंड अत्यंत संवर्धित युरेनियम जप्त करून नष्ट करू! इस्रायलने सुरुवातीपासूनच इराणच्या अणुकार्यक्रमाला आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका मानले आहे.
















