चंद्रपूर : चंद्रपूर शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली असून वाघाच्या हल्ल्यात ४ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-पवनपार परिसरातील ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेंदुपत्ता तोडण्यासाठी १३ महिला जंगलात गेल्या असताना यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ४ महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलिस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर तपास झाल्यावर याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी चार महिलांच्या मृत्यूची जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील ही पहिली घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघाच्या हल्ल्याची ही घटना गुंजेवाही-पवनपार या मार्गावर असलेल्या खैरीचक परिसरातील जंगलात घडली असून सर्व महिला या गुंजेवाही या गावातील रहिवासी आहेत. त्या सर्व महिला भट्टी मोहल्ला वॉर्ड क्रमांक १ येथे राहतात.
भंडा-याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या परिसरात दिवसाच वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. आयुध निर्मितीच्या मुख्य मार्गालगत हा वाघ आला. सध्या तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले असून मानवासह प्राण्यांचीही प्रचंड उकाड्यामुळे ससेहोलपट होत आहे. शरीराची होणारी लाहीलाही मिटविण्यासाठी हा वाघ पाण्याचा छोटासा स्रोत असलेल्या जागेवर बस्तान मांडून आराम करीत असल्याचा येथून जाणा-या एका नागरिकाने हा व्हीडीओ त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयुध निर्माणी परिसरासोबतचे पेवठा ते जवाहरनगर मार्ग आणि डीएससी पलटून टी-पॉईंट उतार (घोडदौड) कोंडी मार्गावरही अनेक नागरिकांना हा वाघ दिसला. हा परिसर नेहमीच वर्दळीचा असल्याने रस्त्यावरून ये-जा करणा-या वाहनधारकांची वाघाला पाहून घाबरगुंडी उडाली. १५ दिवसांपूर्वी या परिसरात मध्यरात्री वाघ बघायला मिळाला होता. त्यानंतर आता दिवसाच वाघाचे दर्शन झाल्याने वन विभागाने या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत
१) कविता दादाजी मोहुर्ले – ४५
२) अनिता दादाजी मोहुर्ले – ४६
३) संगीता संतोष चौधरी – ४०
४) सुनीता कौशिक मोहुर्ले – ३५
















