मुंबई : टी-२० वर्ल्ड कप २०५ स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर ८ मधील लढतीत वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज शिमरॉन हेटमायर याने विक्रमी अर्धशतक झळकावले. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना तिस-या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हेटमायरने १९ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाकडून कोणत्याही बॅटरनं केलेली ही सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद शतकी खेळी करणा-या गेलला जे जमलं नाही ते या पठ्ठानं करून दाखवले.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावल्यावर हेटमायरला या स्पर्धेतील युनिवर्सल बॉस ख्रिस गेलचा जलद शतकी विक्रम मोडण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. ग्रेम क्रेमरने ब्रायन बेनेटकरवी त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. हेटमायरने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड हा ख्रिस गेलच्या नावे आहे. २०१६ च्या हंगामात गेलने इंग्लंडविरुद्ध ४७ चेंडूत शतक झळकावले होते.

