लातूर : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या २६ मे, २०२६ च्या आदेशन्वये सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणा-या व नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, निलंगा, औसा या तालुक्यातील एकूण ४१४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार सोमवार, ८ जून रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. शुकवार, १२ जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावून, तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली, आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित होईल. बुधवार, १७ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला जिल्हाधिकारी यांनी मान्यता देतील. शुक्रवार, १९ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द केले जाईल. दि. १९ ते २५ जून या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करता येईल.
शुकवार, ३ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेवून अभिप्राय देणे, बुधवार, ८ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेवून अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्याची कार्यवाही केली जाईल. १० जुलै, रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिध्दी देण्यात येईल, असे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सायली ठाकूर यांनी कळविले आहे.
















