लातूर : प्रतिनिधी
लातूर-मुंबइ-बिदर एक्सप्रेस रेल्वेला अतिरिक्त ३ डबे मंजूर करण्याच्या मागणीला यश आल्याची माहिती लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी दिली. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने लावून धरलेल्या मागणीची पूर्तता झाल्याने काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचेही खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना खासदार डॉ. शिवाजीराव काळगे म्हणाले की, लातूर-मुंबइ-बिदर या गाडीला अतिरिक्त डबे मिळावेत, ही मागणी मी माझ्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सातत्याने मांडत आलो आहे. खासदार म्हणून निवडून आल्यापासून केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल. बिदर स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेकडून हा विषय काही काळ प्रलंबित होता. नुकत्याच सिकंदराबाद विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या दौ-यादरम्यान या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून आता गाडीच्या रचनेत वाढ झाली आहे.
त्यानुसार, गाडी क्रमांक २२१०७/२२१०८ व २२१४३/२२१४४ लातूर-मुंबइ-बिदर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये दि. २५ जून २०२६ पासून ३ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये एक वातानुकुलित द्वितीयश्रेणी प्रवासी क्षमता ४६ असेल, एक वातानुकुलित तृतीय श्रेणी ज्याची प्रवासी क्षमता ६४ असेल व एक शयनयान श्रेणी ज्याची प्रवासी क्षमता ७२ असेल. यामुळे या गाडीची रचना २१ डब्यांवरून २४ डब्यांची होणार असून अधिक प्रवाशांना आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या निर्णयाबद्दल आपण केंद्रीय रेल्वे प्रशासन, विशेषत: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो,असे खासदार डॉ. काळगे यांनी बोलून दाखविले. मात्र, हा पाठपुराव्याचा पहिला टप्पा आहे. लातूरझ्र बिदर मार्गावरील प्रवाशांना अधिक सुरक्षित, अधिक आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी या गाडीला जुन्या आयसीएफ डब्यांऐवजी अत्याधुनिक व अधिक सुरक्षित एलएचबी डबे उपलब्ध व्हावेत, ही आपली प्रमुख मागणी असून त्यासाठीचा पाठपुरावा यापुढेही पूर्वीप्रमाणेच सातत्याने सुरू राहणार आहे. जनतेच्या हितासाठी आणि लातूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे सुविधांच्या विकासासाठी माझे प्रयत्न अविरत सुरूच राहतील,अशी ग्वाहीही खासदार डॉ. काळगे यांनी दिली आहे.
















