लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांची एक संयुक्त व महत्त्वपूर्ण बैठक आज दि. २१ जून रोजी दुपारी ४: वाजता काँग्रेस भवन, येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार असून नवनिर्वाचित पदाधिका-यांचा भव्य सत्कार सोहळाही होणार आहे.
या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ. वनकर यांची नुकतीच प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लातूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांची निवड झाली आहे. याबद्दल डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. जवळगेकर यांचाही विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात येणार आहे. याचबरोबर, लातूरच्या नवनिर्वाचित महापौर सौ. जयश्री सोनकांबळे तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सहकार संस्थेतील संचालक आणि नगरपंचायत सदस्यांचाही याप्रसंगी सन्मान केला जाणार आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, या बैठकीदरम्यान पक्ष संघटन मजबुतीकरण, सदस्य नोंदणी अभियान, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, स्थानिक प्रश्न तसेच विभागीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या सत्कार समारंभ व बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके हे उपस्थित राहणार आहेत. तरी या महत्त्वपूर्ण बैठकीला लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, तसेच लातूर शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे सर्व प्रभाग अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग अध्यक्ष अॅड. बाबासाहेब गायकवाड आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
















