२५ भाविक जखमी, जखमींवर खाजगी, शासकीय रूग्णालयात उपचार
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
परभणी : प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील परभणी-मानवत महामार्गावरील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील प्रसिध्द मारूती मंदिरात प्रत्येक शनिवारी जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. नेहमी प्रमाणे शनिवार, दि. २० जून रोजी भाविक मोठ्या संख्येने दर्शनसाठी रांगेत उभे होते. दर्शन सुरू असताना अचानक मंदिरासमोरील सभागृहाच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेले सभा मंडपाचे सेंट्रिंग कोसळल्याने त्यावरील घुमटासाठीचे पिलर व मोठमोठे दगड खाली पडले. त्यामुळे याखाली भाविक मोठ्या प्रमाणात दबले. या दुर्घटनेत ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून यातील ४ भाविकांची ओळख पटली आहे तर एका भाविकाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. जखमींपैकी १६ भाविकांवर खाजगी तर इतरांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये मंदिराचा छत भाविकांचा अंगावर कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, उपस्थित भाविक व मंदिर प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. सभागृहाच्या कोसळलेल्या छत व पिलर, दगडाखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या दुर्घटनेत संतोष सर्जेराव गडदे (रा. गडदे पांगरा ता. मंठा), आकाश सुरजोसे (परभणी), मुनेश रामबिलास अग्रवाल (रा.जिंतूर), सुरज बाबासाहेब पोपटकर (रा इटोळी ता.मानवत) यांच्यासह अन्य एका १ अनोळखी इसम मृत्यू पावला आहे. या घटनेतील गंभीर जखमींना परभणी येथील शासकीय रूग्णालय, आर. पी. हॉस्पिटल व अन्य खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सहायक पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने मदतकार्याचा आढावा घेतला असून नेमका घुमट कशामुळे कोसळला याची सखोल चौकशी सुरू केली आहे.
५० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
यशवाडी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय व खाजगी अशा जवळपास ५० ऍम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. त्यामुळे ढिगा-याखाली दबलेल्या भाविकांना तात्काळ बाहेर काढून वेळेत जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहोचविणे शक्य झाले. यावेळी ऍम्बुलन्स चालकांसह उपस्थित भाविकांनी जखमींना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
मृतांच्या नातेवाईकांना
प्रत्येकी ५ लाखांची मदत
यशवाडी येथील हनुमान मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. या घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहेत. स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी असून मदत आणि बचावकार्य वेगाने करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
















