मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचा निकाल २२ जून रोजी जाहीर झाल्यानंतर, आज विधानपरिषद सभागृहात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा दिमाखात संपन्न झाला. गेल्या दोन महिन्यांत पार पडलेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या एकूण १६ सदस्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. यामध्ये पुण्याचे विक्रम काकडे, सोलापूरचे राजेंद्र राऊत, रत्नागिरीचे अनिकेत तटकरे आणि साताऱ्याचे धैर्यशील कदम यांच्यासह इतर आमदारांचा समावेश आहे.
या निवडणुकीत महायुतीने ११ पैकी १० जागांवर दणदणीत विजय मिळवला, मात्र नाशिकमध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर महायुतीत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच, नाशिकमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निकालाच्या संध्याकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गीते यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यपद स्वीकारल्याने तेही आता महायुतीचा भाग झाले आहेत आणि आज त्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली. आजच्या शपथविधी सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांनीही विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली, ज्यासाठी रेवती सुळे यांनीही विधिमंडळ सभागृहात उपस्थिती लावली होती.
शपथविधी दरम्यान सभागृहात लोकप्रतिनिधींचा उत्साह पाहायला मिळाला. भाजपचे अमर राजूरकर यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय श्रीराम, जय भाजपा’ अशी घोषणा दिली, तर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी ‘जय शिवराय’ अशी घोषणा देत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
गेल्या दोन महिन्यांत राज्यात विधानपरिषदेच्या दोन टप्प्यांत निवडणुका झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १० जागांसाठी निवडणूक झाली, ज्यामध्ये सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात महायुतीने ९ तर महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून एका जागेवर सदस्य निवडून गेले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित ११ पैकी १० जागांवर महायुतीने विजय मिळवला. महाविकास आघाडीला या निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. या १७ जागांपैकी महायुतीने १६ जागा जिंकल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवला होता, मात्र ते आता शिंदेंच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य बनले आहेत.
आज विधानपरिषदेत शपथ घेतलेल्या १६ सदस्यांमध्ये विक्रम काकडे, अनिकेत तटकरे, धैर्यशील कदम, गोकुळ गिते, राजीव पोतदार, बसवराज पाटील, अरुण लखाणी, अमर राजूरकर, अविनाश ब्राह्मणकर, दुष्यंत चतुर्वेदी, नंदकिशोर महाजन, प्रवीण पोटे, सुहास शिरसाठ, रवींद्र फाटक, राजेंद्र राऊत आणि प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे.















