बार्शी : टाळ-मृदंगाचा गजर आणि विठू नामाच्या गजरात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरच्या श्री रुक्मिणी माता पालखीचे बार्शी तालुक्यातील शिराळा पाटी येथे उत्साहात, फूले उधळून स्वागत करण्यात आले. पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, सभापती मिनाक्षीताई रोंगे, उपसभापती संतोष (दादा) निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य रेश्माताई डोके, पंचायत समिती सदस्य शरद बसवंत, किरण घुले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सोलापूरचे मुगुटराव मगर, बार्शीचे गट विकास अधिकारी विवेक जमादाडे, बार्शी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी दीपक चव्हाण, खडकलगावचे माजी सरपंच दीपक रोंगे, पाथरीचे सरपंच नेताजी गायकवाड, शैलेश सदाफुले, निलेश जाधव, प्रदीप कुलकर्णी, ग्रामपंचायत अधिकारी अमोल सानप, राहुल गरड, शिवकुमार पायघन, पाथरी ग्रामस्थ हजर होते.
यावेळी जि.प. अध्यक्ष दिपक वैद्य यांनी पालखीचे दर्शन घेत पावसासाठी प्रार्थना केली. आणि अवघ्या काही वेळातच हलक्या पावसाने हजेरी लावली. कौडण्यपूरच्या श्री रुक्मिणी माता पालखीचे काल दु.४ वाजता शिराळा पाटी येथे आगमन होताच सर्व राजकीय पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. सोलापूर जिल्ह्यात प्रथम बार्शी तालुक्यात आगमन होते ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे गौरवोद्गार सभापती मिनाक्षीताई रोंगे यांनी व्यक्त केले. पालखीच्या स्वागताने वारकरी भारावले.
वारकरी, ग्रामस्थांनी दर्शन घेत विठ्ठलनामासह हरिनामाचा गजर केला. कौंडण्यपूरची रुक्मिणी मातेची पालखी ही वारकरी संप्रदायातील प्रमुख १० मानाच्या पालख्यापैकी एक मानली जाते. कौंडण्यपूरच्या या पालखी सोहळ्यात यंदा ४०० वारकरी आहेत. पाथरीतील मुक्काम आटोपून पालखी पुढे जामगाव व त्यानंतर बार्शीकडे प्रस्थान करेल. आज बार्शीत तर उद्या दि.१८ जुलै खांडवीत मुक्काम करुन दि.१९ जुलै रोजी ही पालखी माढा तालुक्यात प्रवेश करणार आहे.
















