लातूर : प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. २ जून २०२६ शासन निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ जाहीर केलेली आहे. जिल्हा बँकेचे मार्गदर्शक तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व राज्याचे सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या पहिल्या व दुस-या यादीमध्ये लातूर जिल्हा बँकेचे ३५ हजार ४०९ शेतकरी पात्र ठरलेले असून २१९ कोटी रूपये रक्कमेचा लाभ शेतक-यांना मिळणार आहे. प्राप्त यादीपैकी आजपर्यंत २५ हजार १३० शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे.
राज्याचे सहकारी मंत्री बाबसाहेबजी पाटील यांच्या प्रयत्नातून आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतक-यांपैकी १८ हजार ५८० शेतक-यांची १२२ कोटी ७१ लाख रक्कम लातूर जिल्हा बँकेस प्राप्त झाली असून मराठवाड्यातील इतर जिल्हा बँकेच्या तुलनेत लातूर जिल्हा बँकेस सर्वाधिक रक्कम मिळाली असल्याचे बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे. सदरील बँकेस मिळालेली रक्कम संबंधित पात्र शेतक-यांच्या खाती सोमवारी जमा होऊन त्यांचे कर्जाचे खाते बेबाकी करून कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. तसेच कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांना बेबाकी प्रमाणपत्र वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आधार प्रमाणीकरण करून घ्यावे
अजूनही १० हजार २७९ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही. कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी यादीतील उर्वरित पात्र शेतक-यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तसेच ज्या शेतक-यांनी अजूनही ‘अॅग्रीस्टॅक’ मंचावर नोंदणी न केल्यामुळे त्यांचा फार्मर आयडी निघाला नाही. त्यांनी फार्मर आयडी काढून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केलेले आहे.
















