पुणे / लातूर : प्रतिनिधी
राज्यात व देशात साखर कारखानदारीत अव्वल स्थान मिळवणा-या देशात ऊस तोडणी १०० टक्के हार्वेस्टरद्वारे करणारा लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यास डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशनकडून देण्यात येणारा बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६ अवॉर्ड पुणे येथील शानदार सोहळ्यात शनिवारी राज्याचे माजी अर्थमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा अवॉर्ड राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्यासह सन्माननीय संचालक मंडळाने स्वीकारला.
या शानदार पारितोषीक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची उपस्थिती होती. तसेच द वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले, द शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष संजय अवस्थी, द साउथ इंडियन अँड शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष आर. वी. कुंभार, सोहन शिरगावकर, एस. डी. बोखारे, एम. के. पटेल, सी. जी. माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
मांजरा साखर कारखान्याचे एक पाऊल पुढे
देशात, राज्यात सहकार क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून लोकनेते विलासराव देशमुख, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या साखर कारखान्याने गेल्या ४० वर्षात जे जे नवं ते ते हवं, या युक्तीप्रमाणे नवीन तंत्रज्ञान विकसित करून वेगळा ठसा उमटवला आहे. मागच्या ३ वर्षापासून हार्वेस्टरद्वारे १०० टक्के ऊस तोडणी करणारा देशातील पहिला कारखाना ठरलेला असून आजतागायत कारखान्यास तब्बल ६० पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात राज्य शासन, व्हि. एस. आय. सह विविध देश राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेला हा पहिला कारखाना म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कार्यक्रमास विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, संचालक कैलास पाटील, तात्यासाहेब देशमुख, वसंत उपाडे, सदाशिव कदम, अनिल दरकसे, मदन भिसे, शंकरराव बोळंगे, नीळकंठ बचाटे, नवनाथ काळे, सचिन शिंदे, बाळासाहेब पांढरे, दयानंद बिडवे, विलास चामले, अरुण कापरे, भैरू कदम, सुरेश चव्हाण, श्रीकृष्ण काळे, तानाजी जाधव, शत्रुघन पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई यांच्यासह खाते प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
















