जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील रावणकोळा व परिसरातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठ्यामुळे नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असताना या गंभीर समस्येची दखल घेत माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांची लातूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन स्थानिक शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, पाणीपुरवठा आणि दैनंदिन कामांवरही त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. याची गंभीर दखल घेत माजी मंत्री संजय बनसोडे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.रावणकोळा व परिसरातील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या. यावर मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी आवश्यक ती तातडीने कार्यवाही करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जळकोट नगरपंचायतीचे उपाध्यक्ष मन्मथ किडे, रावणकोळ्याचे सरपंच सत्यवान दळवे पाटील, अॅड. फिरोज पटेल, जयराज दळवे पाटील, उपसरपंच नभीभाई पटेल, माजी चेअरमन बळीराम दिंडे, माजी पोलिस पाटील गणपत दळवे पाटील यांच्यासह रावणकोळा व परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. माजी मंत्री संजय बनसोडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे रावणकोळा व परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
















