ओस्लो : चेताविज्ञान (न्यूरोसायन्स) क्षेत्रात क्रांती घडवून आणणा-या ऑप्टोजेनेटिक्स तंत्रज्ञानाच्या आणि प्रकाश-नियंत्रित आयन चॅनेलच्या शोधासाठी २०२६ चा शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार जाहीर झाला. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल सभेने सोमवारी अमेरिकेचे कार्ल डायसेरोथ, जर्मनीचे पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार संयुक्तपणे प्रदान करण्याची घोषणा केली. नोबेल समितीचे अध्यक्ष पेर स्वेनिंगसन यांच्या मते, या संशोधकांनी न्यूरोसायन्सच्या एका नवीन युगाचा पाया घातला असून, यामुळे मेंदूचा असा नकाशा तयार करणे शक्य झाले आहे, ज्याचे एकेकाळी केवळ स्वप्न पाहिले जात होते.
ऑप्टोजेनेटिक्स हे एक आधुनिक जैवतंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये प्रकाशाचा वापर करून जिवंत मेंदूतील विशिष्ट चेतापेशींवर नियंत्रण ठेवले जाते. या तंत्रज्ञानामुळे संशोधकांना मेंदूतील वैयक्तिक चेतापेशी आणि चेतामंडळे चालू (स्विच ऑन) किंवा बंद (स्विच ऑफ) करून अभ्यास करणे शक्य झाले आहे.
शोधाचा प्रवास : शैवालापासून जिवंत मेंदूपर्यंत
पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांनी क्लॅमिडोमोनास या एकपेशीय शैवालामध्ये चॅनेल-होडॉप्सिन-१ आणि चॅनेल-होडॉप्सिन-२ या प्रकाश-संवेदनशील प्रथिनांचा शोध लावला. नागेल आणि हेगेमन यांनी बेडकाच्या अंडपेशींमध्ये ही जनुके टाकून सिद्ध केले की, निळ््या प्रकाशाच्या संपर्कात येताच ही प्रथिने पेशीपटलात मार्ग उघडून धनप्रभारित आयन आत घेतात आणि प्रकाशाचे विद्युत संकेत निर्माण करतात. कार्ल डायसेरोथ यांनी या शोधाचा वापर चेतापेशी नियंत्रित करण्यासाठी केला. २००५ मध्ये त्यांच्या पथकाने उंदराच्या चेतापेशींमध्ये चॅनेल-होडॉप्सिन-२ चे जनुक टाकले आणि निळ्या प्रकाशाच्या सहाय्याने त्या पेशींकडून चेतासंकेत निर्माण करून घेतले. पुढे २००७ मध्ये डायसेरोथ आणि त्यांच्या टीमने जिवंत उंदरांच्या मेंदूतील चेतापेशींवर प्रकाशाच्या मदतीने यशस्विरीत्या नियंत्रण मिळवून दाखवले.
















