तेल अवीव : युद्ध अजून संपलेले नाही. इस्लामच्या विरोधात लढणा-यांना घेऊन जाणारी विमाने अजूनही आकाशात उडत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते अशी उघड धमकी अल-कायदाशी संबंधित एका प्रकाशनाने दिली आहे. ३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणा-या फ्लायदुबईच्या विमानातील कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ही धमकी मिळाली आहे. फ्लायदुबईचा सह-वैमानिक (को-पायलट) हमम अल-हमामी याच्या चौकशीदरम्यान ही नवीन बाब समोर आली आहे.
३० सप्टेंबरला ओमानचा नागरिक आणि सहवैमानिक अल-हमामीने एफझेड १०७३ या विमानातील कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर क्रॅश अॅक्सने (आणीबाणीच्या वेळी वापरली जाणारी कु-हाड) हल्ला केला. विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तपासाचा एक भाग म्हणून त्याच्या सोशल मीडिया खात्यांचीही छाननी केली जात आहे; त्यावर अमेरिकेच्या लष्करी कारवाईत ठार झालेला अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आणि अयमान अल-जवाहिरी यांच्यासह अनेक व्यक्तींशी संबंधित मजकूर आढळून आला आहे.
हल्लेखोराच्या सोशल मीडियाची तपासणी
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की हल्लेखोर कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होता. विमानाचा अपघात घडवून त्यातील प्रवाशांचा बळी घेण्याचा त्याचा उद्देश होता. इस्रायली अधिका-यांनीही तो अतिरेकी विचारसरणीच्या संपर्कात असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. अल-हमामीशी संबंधित सोशल मीडिया खात्यांवर सापडलेल्या मजकुरामुळे तपासाला एक नवीन वळण मिळाले आहे. या खात्यांवरील काही पोस्ट्समध्ये कॉकपिटमधील व्हीडीओ आणि जवळच असलेल्या इस्रायली विमानाकडे कॅमेरा फिरवतानाचे फुटेज दिसून आले.
अल-हमामीबद्दल माहिती समोर?
अल- हमामीचा अयमान अल-जवाहिरीचा फोटो दिसून आला. तसेच, २००९ मध्ये अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला करणा-या हुमाम खलील अबू-मुलाल अल-बालावी याचाही त्यात उल्लेख होता. तथापि, अल-हमामीने हे स्वत: पोस्ट केले होते की, त्याच्या नावाचा वापर करून दुस-या कोणीतरी पोस्ट केले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यानंतर काही खाती डिलीट करण्यात आली. फ्लायदुबईमध्ये रुजू होण्यापूर्वी, अल-हमामी यांनी ओमान एअर आणि रॉयल एअर मारोकसाठी काम केले होते. ओमान एअरमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या अतिरेकी विचारांबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि त्यांना उड्डाणाशी संबंधित कर्तव्यांवरून हटवून प्रशासकीय जबाबदा-यांवर नियुक्त करण्यात आले होते.
















