अभूतपूर्व नाकाबंदी, दिल्लीसह देशभरात ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आज एल्गार पुकारला आहे. मात्र, आंदोलन मोडून काढण्यासाठी आज दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे बळाचा वापर केला. जंतरमंतरवर आंदोलनासाठी येणा-या लोकांना रोखतानाच विमानतळासह सार्वजनिक ठिकाणी धरपकड करीत हजारो आंदोलकांना ताब्यात घेतले. आता या आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदे यांच्याकडे दिली आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे जाहीर करीत अजिंक्य शिंदे यांनी रविवारीही आंदोलन करण्याची घोषणा केली.
अभिजित दिपके यांच्यासह त्यांच्या टीमला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने दिपके यांनी तयार केलेल्या प्लॅन बीनुसार आता अजिंक्य शिंदेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू राहील, असे सांगण्यात आले. दिपकेंनी तसा व्हीडीओ जारी करून शिंदेंकडे आंदोलनाची धुरा सोपविली. त्यानंतर सायंकाळी अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत अभिजित दिपके, सौरव दास व आशुतोष रांका या तिघांचा संपर्क नसल्याचे म्हटले. आज पोलिसांनी बळाचा वापर केला असला तरीही कोणत्याही स्थितीत आम्ही माघार घेणार नाही. पुन्हा आम्ही एकदा जंतरमंतरकडे जाणार आहोत आणि जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे म्हटले. दिल्लीत झालेल्या पोलिस बळानंतर देशातील विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. आजच्या आंदोलनात जेन झी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, वकील संघटनांचाही सहभाग दिसून आला.
आंदोलनाची धुरा
अंिजंक्य शिंदेंकडे
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अभूतपूर्व सुरक्षा कारवाईदरम्यान, जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या नियोजित आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करत आहेत. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि आयोजक सौरव दास व आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी घेतले. त्यानंतर या आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे आली.
आता नव्या
लढाईला सुरुवात
मोदी, शाह यांची भीती म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकल्याचे द्योतक आहे. आता नव्या लढाईला सुरुवात झाली आहे. ज्या लोकांचा मतदानाचा अधिकार चोरीला गेलेला आहे, तो परत मिळावा, हीच आमची मागणी आहे, अशी भूमिका अजिंक्य शिंदे यांनी मांडली.
शिंदे यांचे उमरगा,
लातूरशी कनेक्शन
दिपकेंच्या अनुपस्थितीत सीजेपीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अजिंक्य शिंदे यांचे उमरगा आणि लातूरशी कनेक्शन आहे. कारण ते मूळ उमरगा तालुक्यातील मूळजचे रहिवासी असून, त्यांचे लहानपण औसा तालुक्यातील उजनीत गेले. शेतक-यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लातूर जिल्ह्यात अनेकदा आंदोलन केले आहे.
















