औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा देत पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये जाहीर केली आहे. कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या उसापोटी पहिल्या हप्त्याची तब्बल ९ कोटी ८९ लाख ३० हजार २८३ रुपयांची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
कारखान्याचा चालू गळीत हंगाम १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाला. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कारखान्याने एकूण ३२ हजार ९७६.७६१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या गाळप झालेल्या उसासाठी प्रतिमेट्रिक टन ३ हजार रुपये याप्रमाणे पहिल्या उचलीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. मांजरा परिवाराचे आधारवड सहकारमहर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेवरून व मांजरा साखर परिवाराच्या धोरणानुसार चेअरमन शाम भोसले व सर्व संचालक मंडळाच्या विचारविनिमयातून ही रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. यू. बहिर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि कारखान्याचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी व्यवस्थापनाकडून नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याचा अंतिम ऊसदर हा मांजरा साखर परिवाराच्या परंपरेप्रमाणे सर्वाधिक ठेवण्याचा तसेच ऊस बिलाची रक्कम वेळेत अदा करण्याचा मानस असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला जास्तीत जास्त ऊस मारुती महाराज कारखान्यास गाळपासाठी द्यावा, असे आवाहन चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
















