लातूर : प्रतिनिधी
सहकार आणि साखर उद्योगातून सभासद, ऊसउत्पादक व कामगारांच्या हित जोपासणारे विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी आणि विलास सहकारी साखर कारखाना लि., तोंडार, उदगीर या दोन्ही कारखान्यांच्या वतीने गाळप झालेल्या ऊस उत्पादकांच्या ऊसाला दीपावली सणापूर्वीच पहिला हप्ता प्रति टन ३ हजार प्रमाणे खात्यात जमा करण्यात आला आहे. मांजरा परिवारातील साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रति टन तीन हजार रुपये पहिली उचल देणार असल्याची घोषणा सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली होती. गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या घोषणेला बांधील राहून मराठवाडयात सर्वांधित ऊसदर दिला जाईल असे सांगीतले होते.
विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळीच्या वतीने दीपावलीपूर्वी बँक खात्यात पहिला हप्ता म्हणून १६ कोटी ८ लाख ९३ हजार रुपये (प्रति मेट्रिक टन ३,०००/- प्रमाणे) जमा करण्यात आले आहेत. या कारखान्याचे आज अखेर गाळप दिवस १४ झाले असून, यादरम्यान ७३ हजार ९७० मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. या गाळपातून आज अखेर ६१ हजार ६६० साखर पोती (क्विंटल) उत्पादित झाली असून कारखान्याचा आजअखेर साखर उतारा ८.५० टक्के इतका राहिला आहे.
तसेच, विलास सहकारी साखर कारखाना लि., तोंडार, उदगीरच्या वतीने दीपावलीपूर्वी बँक खात्यात पहिला हप्ता म्हणून १७ कोटी ३० लाख रुपये (प्रति मेट्रिक टन ३,०००/- प्रमाणे) जमा करण्यात आले आहेत. या कारखान्याचे आज अखेर गाळप दिवस १९ झाले असून, यादरम्यान ७३ हजार २८० मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. या गाळपातून आज अखेर ६३ हीजार ४०० साखर पोती (क्विंटल) उत्पादित झाली असून कारखान्याचा आजअखेर साखर उतारा ८.८५ टक्के इतका मिळाला आहे.
सद्यस्थितीत भागात दुष्काळजन्य परिस्थिती असून पाण्याअभावी ऊस पिकाचे नुकसान होत आहे. हे लक्षात घेऊन शेतक-यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखान्याचे दैनंदिन गाळप वाढवून नोंद झालेल्या सर्व ऊसाचे वेळेत गाळप करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. मराठवाड्यात अंतिम ऊसदर सर्वाधिक राहील यासाठी प्रयत्न केले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शेतक-यांचा ऊस कारखान्यास गाळपासाठी आला आहे, त्यांनी संबंधित बँक शाखेतून बिलाची रक्कम उचल करून घ्यावी आणि जास्तीत जास्त ऊस विलास कारखान्यास द्यावा, असे आवाहन चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजनाथराव शिंदे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.
दिवाळी शुभेच्छा
सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार बंधू-भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलास सहकारी साखर कारखाना नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विक्रमी गाळप साध्य करून शेतक-यांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे. आपली ही दिवाळी आनंदात आणि गोड जावो, हीच सदिच्छा!
— माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख
















