वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयच्या गैरवापराबाबतही जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही एआयच्या संभाव्य धोक्याबाबत गंभीर इशारा दिला आहे. एआयचा वापर चुकीच्या हेतूने झाल्यास अत्यंत मोठया प्रमाणावर जीवितहानी घडवून आणणा-या घटना घडू शकतात, असे गेट्स यांनी म्हटले आहे.
गेट्स यांच्या मते, एआय इतके शक्तिशाली तंत्रज्ञान बनले आहे की, त्याच्या दुरुपयोगातून घडणा-या घटनांमध्ये १ अब्ज लोकांपर्यंत मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, गेट्स यांनी एआयमुळे निश्चितपणे १ अब्ज लोकांचा मृत्यू होईल, असा दावा केलेला नाही. त्यांनी अत्यंत प्रगत एआय साधने आणि त्यांचा गैरवापर करणा-या व्यक्ती किंवा गट यांच्या संयोगातून निर्माण होऊ शकणा-या संभाव्य परिस्थितीचा इशारा दिला आहे.
एका मुलाखतीत गेट्स यांना एआयच्या संभाव्य धोक्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी एआय कंपन्यांनी स्वत:च तयार केलेले सुरक्षा नियम पुरेसे नसल्याचे मत व्यक्त केले. एआयची क्षमता जसजशी वाढत जाईल, तसतशी त्याच्या विकास आणि वापरावर स्पष्ट कायदेशीर नियम, सुरक्षा उपाय आणि देखरेख आवश्यक ठरेल, असे त्यांनी सांगितले. एआयच्या नियमनासाठी कायदे करण्याची गरज असून सरकार, कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि राजकीय नेतृत्वाने या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असल्याचे गेट्स यांनी म्हटले.
चुकीच्या हेतूचा संगम धोकादायक
गेट्स यांच्या चिंतेचा मुख्य मुद्दा म्हणजे एआयचा गैरवापर. अत्याधुनिक एआय टूल्सचा वापर जर चुकीच्या हेतूने करणा-या व्यक्ती किंवा संघटनांच्या हाती गेला, तर मोठया प्रमाणावर नुकसान घडवून आणण्याची त्यांची क्षमता वाढू शकते, असा त्यांचा इशारा आहे. एआयचा गैरवापर सायबर हल्ले, फसवणूक, चुकीची माहिती, डीपफेक तसेच इतर हानिकारक कामांसाठी होण्याची शक्यता यापूर्वीही तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केली आहे. गेट्स यांच्या मते, त्यामुळे एआयची सुरक्षा केवळ कंपन्यांच्या अंतर्गत धोरणांवर सोडणे योग्य ठरणार नाही. सुरक्षा आणि मॉनिटरिंगसाठी बंधनकारक नियम असणे आवश्यक आहे.
एआयमुळे वेगवान विकासावरही चिंता
एआयच्या वाढत्या क्षमतेबाबत चिंता व्यक्त करणारे गेट्स हे एकमेव तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्ती नाहीत. एॅट्रोपिकचे सीईओ डारियो अमोडेई यांनीही सप्टेंबर २०२६मध्ये एआय मॉडेल्सच्या क्षमतेत होणा-या वेगवान वाढीचा वेग काही प्रमाणात कमी करण्याचे आवाहन केले आहे. अमोडेई यांच्या मते, एआयची क्षमता ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रणाची साधने मागे पडू शकतात. त्यांनी तृतीय-पक्षाकडून एआय मॉडेल्सचे सुरक्षा मूल्यांकन, उद्योगातील समन्वय आणि सरकारांशी आंतरराष्ट्रीय सहकार्य यांसारख्या उपायांची मागणी केली आहे.
















