मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून विरोधकांनी थेट राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विधान परिषदेचे आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते अंबादास दानवे यांनी टायगर श्रॉफसहित तर गेल्या काही महिन्यांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात घडलेल्या हाय-प्रोफाईल गोळीबाराच्या घटनांची यादीच समोर ठेवली आहे. यामध्ये त्यांनी ५ प्रमुख घटनांचा उल्लेख केला आहे.
या पोस्टमधून दानवे यांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेवर थेट प्रहार केला आहे. देवेंद्र फडणवीस हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना आपले राजकीय गुरू मानतात. मुंडे हे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि गँगवार मोडून काढले होते, या संदर्भाचा आधार घेत दानवे यांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे.
ज्या नेत्याने मुंबईतील गँग संपवल्या, त्याच नेत्याचा शिष्य म्हणवून घेणारी व्यक्ती आज राज्याची गृहमंत्री आहे! पण दोघांमधला फरक अगदी स्पष्ट आहे, असा टोला दानवे यांनी लगावला आहे. राज्यात इतके गंभीर गुन्हे घडत असतानाही कोणीही त्यावर उघडपणे बोलायला तयार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, प्रदीप पूर्णेकर हत्या, अभिषेक घोसाळकर गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेरील फायरिंग, टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबार या घटनांची मालिका मांडत दानवे यांनी राज्यातील गुंडगिरी आणि गँगस्टर्सचे प्रस्थ कसे वाढले आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
















