रियाध : वृत्तसंस्था
सौदी अरेबियाची राजधानी असणा-या रियाध येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाले तर ३०९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार सौदी नागरिकांह बांगलादेशचे दोन, अमेरिका, जॉर्डन, पॅलेस्टाईन, सीरिया, सुदान व इजिप्त येथील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे, अशी माहिती सौदी नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिली आहे. या हल्ल्यानंतर किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाज स्थगित करण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेसह इजिप्त, पॅलेस्टाईन आणि कतार या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. आम्हाला नुकतेच या हल्ल्याबद्दल समजले आहे, त्यामुळे आम्ही निर्णय घेऊ. आम्ही खूप वेगाने पावले उचलतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा संकल्प केला आहे; त्यांनी या हल्ल्याचे वर्णन ‘युद्धगुन्हा’ असे केले असून त्यासाठी येमेनच्या हुथी बंडखोरांना जबाबदार धरले आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्याबाबत हुथी बंडखोरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र गुरुवारी याच विमानतळावर झालेल्या स्वतंत्र हल्ल्यांमागे आपलाच हात असल्याचे त्यांनी मान्य केले होते. त्या हल्ल्यांमध्ये तीन जण ठार झाले होते आणि एका विमानाचे नुकसान झाले होते.
हुथी बंडखोरांकडून सौदीमधील विमानतळे लक्ष्य
६ आणि ७ ऑक्टोबर रोजी सौदीच्याा दोन वेगवेगळ्या विमानतळांवर हुथी बंडखोरांनी केलल्या स्वतंत्र हल्ल्यांमध्ये आणखी तीन जण ठार झाले होते. मे २०१५ नंतर सौदी अरेबियात झालेला शनिवारी झालेला हा हल्ला सर्वात प्राणघातक ठरला आहे. येमेनमध्ये सौदीचा पाठिंबा असलेली सरकारी दले आणि इराणचा पाठिंबा असलेले व देशाच्या बहुतांश भागावर नियंत्रण ठेवणारे हुथी बंडखोर यांच्यातील संघर्ष अलीकडच्या काळात तीव्र झाला आहे.
सलग दुस-या दिवशी हल्ला
सौदी-नेतृत्वाखालील आघाडीने दिलेल्या माहितीनुसार, रियाधच्या विमानतळावरील हल्ल्यांव्यतिरिक्त, शनिवारी पूर्व सौदी अरेबियातील दम्मम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळही एक क्षेपणास्त्र किंवा तत्सम वस्तू येऊन पडली. शनिवारी जारी केलल्या निवेदनात सौदीच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने सांगितले की, जखमींपैकी काहींची प्रकृती ‘गंभीर’ आहे. विमानतळाचे झालेले नुकसान तपासले जात आहेत.
प्रवाशांसह विमानतळ कर्मचा-यांचाही मृत्यू
वृत्तसंस्था रॉयटर्सने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गेट क्रमांक ४०१ वर हल्ला झाला. अनेक लोक जखमी झाले. काही जण सैरावैरा धावत होते. , डझनहून अधिक रुग्णवाहिका विमानतळाच्या दिशेने वेगाने जाताना दिसल्या. सौदी-नेतृत्वाखालील आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मालिकी यांनी नंतर सांगितले की, प्रवासी टर्मिनलपैकी एकावर झालेल्या या हल्ल्यात सामान्य प्रवासी आणि विमानतळ कर्मचा-यांचा मृत्यू झाला तसेच अनेकजण जखमी झाले.
अमेरिकेकडून हल्ल्याचा तीव्र निषेध
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सौदी अरेबियावरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि या हल्ल्यांमध्ये एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या वत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच त्यांनी या हल्ल्याचे वर्णन ‘पूर्ण-प्रमाणित युद्धगन्हा’ असे केले आहे.
आम्ही खूप वेगाने पावले उचलतो: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आम्ही तसे करू शकतो. आम्ही त्याबाबत विचार करू. आम्हाला नुकतेच या हल्ल्याबद्दल समजले आहे, त्यामुळे आम्ही निर्णय घेऊ. आम्ही खूप वेगाने पावले उचलतो दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्यांबद्दल ‘तीव्र धक्का’ व्यक्त केला; त्यांनी या हल्ल्यांना ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लघंन’ म्हटले आहेत. तसेच असे हल्ले तत्काळ थांबवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रियाध येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेकउड्डाणे रद्द
अखाती देशांमधील अनेक विमान कंपन्यांनी या विमानतळावरून आपली उड्डाणे रद्द केल्याचे जाहीर केले; यात कुवेत एअरवेजने तेथील ‘सुरक्षेची परिस्थिती’हे कारण दिले. ‘फ्लाईट रडार’ या विमान वाहतूक ट्रॅकरच्या माहितीनुसार, रियाधकडे जाणारी सर्व उड्डाणे एकतर अन्यत्र वळवण्यात आली आहेत किंवा रद्द करण्यात आली आहेत.
















