वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत गेल्या २४ तासांत चार अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इराणची दादागिरी मोडीत काढण्यासाठी ट्रम्प आता ‘आर-पार’च्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे.
‘शूट अँड किल’चे आदेश
इराणची छोटी नौदलाची जहाजे किंवा ‘गनबोट्स’ जर होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये सुरुंग (Mines) पेरताना आढळली, तर त्यांना थेट उडवून देण्याचे (Shoot and Kill) आदेश ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला दिले आहेत. इराणच्या समुद्री चाचेगिरीला रोखण्यासाठी उचललेले हे सर्वात कठोर पाऊल मानले जात आहे.
नौदल नाकेबंदी (Naval Blockade) कायम
इराणने होर्मुजचा मार्ग अंशतः खुला केल्याचा दावा केला असला तरी, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत इराणशी १००% व्यवहार (Deal) पूर्ण होत नाही, तोपर्यंत इराणच्या बंदरांवर अमेरिकन नौदलाची नाकेबंदी सुरूच राहील. इराणच्या तेल निर्यातीची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे.
तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची तैनाती
अमेरिकेने या भागात आपली ताकद वाढवण्यासाठी ‘USS George H.W. Bush’ ही तिसरी मोठी विमानवाहू युद्धनौका तैनात केली आहे. यामुळे हिंदी महासागर आणि ओमानच्या आखातात अमेरिकेची पकड अधिक मजबूत झाली आहे.
‘टोटल कंट्रोल’चा दावा
ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून जाहीर केले आहे की, होर्मुजच्या सामुद्रधुनीवर आता अमेरिकेचे ‘पूर्ण नियंत्रण’ आहे. इराणकडून व्यापारी जहाजांकडून वसूल केल्या जाणाऱ्या ‘टोल’ला (Fees) त्यांनी बेकायदेशीर ठरवून इराणला कडक इशारा दिला आहे.
इराणची कोंडी आणि जागतिक परिणाम
इराणने प्रत्युत्तर म्हणून होर्मुजचा मार्ग पुन्हा बंद करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत अमेरिकन नाकेबंदी हटवली जात नाही, तोपर्यंत ते हा मार्ग मोकळा करणार नाहीत. या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहेत. होर्मुजमधून भारताची मोठी तेल आयात होते. या भागात भारतीय जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतानेही इराणच्या राजदूतांना पाचारण करून आपली चिंता व्यक्त केली आहे.
“इराण आम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाही. एकतर त्यांनी सन्मानाने करार करावा, नाहीतर परिणामांना सामोरे जावे.”
— डोनल्ड ट्रम्प (व्हाइट हाऊस येथील पत्रकार परिषद)

