मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. विदर्भातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शिशुपाल पटले हे अधिकृतरीत्या काँग्रेसमध्ये सामील झाले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, तुमसरचे माजी आमदार अनिल बावनकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शिशुपाल पटले हे २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपाकडून निवडून आले होते. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. पोवार समाजाचे नेते म्हणून शिशुपाल पटले यांची ओळख आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. याचा फायदा विधानसभेला काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिशुपाल पटले म्हणाले की, आपण अनेक वर्षे भाजपमध्ये काम केले, पण आता तो भाजप राहिला नाही. तो आता व्यापारी आणि ठेकेदारांचा पक्ष झाला आहे. या पक्षाला शेतकरी, सर्वसामान्य जनतेशी काही देणंघेणं राहिलेलं नाही.
ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडण्याचे घृणास्पद प्रकार करून सत्ता मिळवण्याचा हव्यास आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आवडलेला नाही. या देशातील आणि राज्यातील जनतेला न्याय देण्याचे आणि राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो, त्यामुळे नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे शिशुपाल पटले यांनी सांगितले.