दुबई : दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ (Flydubai) विमानामध्ये मध्य आकाशात घडलेल्या एका अत्यंत भीषण आणि थरारक घटनेत भारतीय वंशाचे वैमानिक कैप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे तब्बल १८० प्रवाशांचे प्राण सुरक्षित वाचले आहेत. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी कैप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय धैर्याचे कौतुक करत त्यांना ‘सच्चा हिरो’ आणि शूरवीर असे संबोधले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हवेमध्ये सुमारे ३४ हजार फूट उंचीवर प्रवास सुरू असताना विमानातील सहवैमानिकाने (को-पायलट) अचानक हिंसक रूप धारण केले. त्याने कैप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला आणि विमान क्रॅश करून हायजॅक करण्याचा भीषण प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात कैप्टन मच्छार गंभीर जखमी झाले आणि रक्तबंबाळ झाले, तरीही त्यांनी कमालीचे धैर्य दाखवत त्या सहवैमानिकाचा जोरदार प्रतिकार केला. हल्ला होत असतानाही त्यांनी तातडीने आणीबाणीचा (हायजॅक/इमर्जन्सी) कोड अलर्ट पाठवला आणि कॉकपिटचा दरवाजा अनलॉक केला. अवघ्या काही सेकंदांत विमान हजारो फूट खाली कोसळत असताना, गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी विमानाचे नियंत्रण सोडले नाही आणि सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर विमानाचे सुरक्षित आणीबाणी लँडिंग (Emergency Landing) घडवून आणले.
कैप्टन स्मित मच्छार हे ९,७५० हून अधिक तासांचा प्रदीर्घ अनुभव असलेले निष्णात भारतीय वैमानिक असून, त्यांनी यापूर्वी भारतातील स्पाईसजेट कंपनीतही सुमारे ११ वर्षे सेवा बजावली आहे. त्यांनी दाखवलेल्या या अभूतपूर्व प्रसंगावधानामुळे विमानातील सर्व १८० इस्रायली प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांचे प्राण सुरक्षित राहिले. या घटनेनंतर जगभरातून त्यांच्या शौर्याची प्रशंसा केली जात असून, भारताचा हा सुपुत्र जागतिक स्तरावर धाडसाचा आणि कर्तबगारीचा नवा आदर्श ठरला आहे.
















