पुणे : देशात प्रचंड असंतोष वाढत असून यामुळेच ‘कॉकरोज पार्टी’ काढण्याची वेळ तरुणांवर आली आहे. अशा स्थितीत क्रांती घडविण्याची ताकद फक्त काँग्रेस पक्षात असून जनतेने पुन्हा काँग्रेसच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ‘उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,’ या ओळी उद्घृत करत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
प्रियंकाजी महिला उद्योग व वसंतदादा सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमच येथे ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, वसंतदादा सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय बालगुडे, संजीवनी बालगुडे आदी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, कॉकरोज जनता पार्टीचे एक्स अकाऊंट संस्पेड झाले आहे. सरकार झुरळांना घाबरले आहे हे यातून दिसतेय. इथल्या झुरळांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे आभार मानायला पाहिजेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यामुळे झुरळांची प्रतिष्ठा वाढली. झुरळांना मारण्यासाठी औषध कंपन्यांनी भरपूर फवारण्या केल्या, नवनवीन औषधे काढली, तरी झुरळ व्यवस्थेच्या विरोधात उभे आहेत. आणि ही झुरळं किती ताकदीची आहेत हे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यामुळे कळाले. यापुढे दोन पायांच्या आळशी, बेरोजगार झुरळांना चांगले दिवस येणार आहेत.
दोन पायांची झुरळं सरकारला सळो की
पळो करून सोडणार : संजय राऊत
न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्यामुळे झुरळांची प्रतिष्ठा वाढली, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच दोन पायांची झुरळं सरकारला सळो की पळो करून सोडणार असेही संजय राऊत म्हणाले. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, या देशात नवीन कॉकरोज जनता पक्ष स्थापन झाला आहे. देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी ज्यांना बेरोजगार आणि आळशी म्हणून संबोधले, अशा तरुणांचा संताप आणि उद्रेक दिसत आहे. कॉकरोज जनता पार्टी व्यंगाच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यवस्थेच्या विरुद्ध लढताना दिसत आहे. व्यंग हे राजकारणातले सर्वांत मोठे हत्यार आहे.
सीजेआय यांनी तरुणांची माफी मागावी : आंबेडकर
कॉकरोज जनता पार्टी प्रकरणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, तरुणांचा उद्रेक बाहेर पडला असून आता तो दिसतोय. सीजेआयने युवकांची माफी मागितली पाहिजे. कारण तरुणांना असे झुरळ बोलू नये. त्यांनी खुलासा करावा. माफी मागितल्याने त्यांची किंमत कमी होणार नाही.
















