नवी दिल्ली : इटालियन प्रवाशांनी अनिवार्य निर्गमन इमिग्रेशन प्रक्रिया टाळल्याप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचा-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता या प्रवाशांना दिल्ली म्युनिक विमानात चढण्याची परवानगी देण्यात आली. याप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचा-यावर कारवाई करण्यात आली.
प्रवाशांना विमानतळावरील निर्धारित मार्गांवरून नेण्यासाठी नेमलेल्या एअर इंडियाच्या कर्मचा-याने विहित कार्यपद्धतीचे पालन केले नाही, असे तपासात आढळून आले. या घटनेमुळे कनेक्टिंग आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणा-या प्रवाशांसाठीच्या कार्यप्रणाली आणि सुरक्षा प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडियासोबतच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला. यामध्ये बोर्डिंग-पास जारी करणे, प्रवाशांचे मार्ग निश्चित करणे, कनेक्टिंग विमानतळावर प्रवाशांचे विलगीकरण आणि हालचाल, तसेच डिजीयात्राच्या भूमिकेचा समावेश आहे.
















