सोलापूर : होटगी रोड विमानतळाच्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणात महापालिकेचे कर संकलन विभागातील लिपिक वलीसाब शेख यांना आयुक्त शीतल तेली उगले यांनी निलंबित केले. अनेक वर्षांनंतर या प्रकरणातील एक मासा गळाला लागला.
होटगी रोड विमानतळाच्या सुमारे ३४ एकर जागेची बेकायदेशीर विक्री झाली आहे. जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेऊन विमानतळाच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणात न्यायालयीन लढाई सुरू आहे.शहरातील रेखा हिरेमठ आणि अन्य सहाजणांनी ही जागा नोटरीवर खरेदी केली होती. या प्रकरणात वलिसाब शेख यांच्याकडून फसवणूक झाल्याची तक्रार हिरेमठ यांनी जिल्हा प्रशासन, विजापूर नाका पोलिस आणि आयुक्तांकडे केली होती.
आयुक्त शीतल तेली उगले यांनी वलीसाब शेख यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. शेख यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. होटगी रोड विमानतळाची जागा असंख्य लोकांना विकण्यात आली आहे. या जागेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे असंख्य लोक अडचणीत आले आहेत. जागा विक्रीचे कारनामे हत्तुरे वस्ती परिसरातील माजी नगसेवकांच्या नातेवाइकांनी केल्याचे लोक उघडपणे सांगतात. पोलिसांनी, महसूल यंत्रणेने या मंडळींना ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली.