सुलतानपूर : यूपीच्या सुलतानपूरमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर आज दुपारी २ वाजता लढाऊ विमानांचा एअर शो सुरू झाला आहे. सर्वात आधी वायुसेनेच्या सी २९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने एक्सप्रेस-वेवर बनवलेल्या धावपट्टीवर (रनवेवर) लँडिंग केली. नंतर जग्वारने उड्डाण केले.
सुखोई आणि मिराज फायटर जेट्सनी टेकऑफ आणि लँडिंग केली. शो पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. ६ तास चालणा-या एअर शोसाठी ५ किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये ४ तास हा सराव चालला होता. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधान मोदींनी सुलतानपूरमधूनच पूर्वांचल एक्स्प्रेस-वेचे उद्घाटन केले होते. पंतप्रधान मोदी एअरफोर्सच्या हरक्युलिस विमानातून एअर स्ट्रिपवर उतरले होते. लखनौ ते गाझीपूरपर्यंत बनलेल्या ३४१ किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस-वेची किंमत २२,४९४.६६ कोटी रुपये आहे. ऑक्टोबर २०१८ पासून याचे बांधकाम सुरू झाले होते, जे सप्टेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले.
एक्स्प्रेस-वे लष्करी कारवाईसाठी महत्त्वाचा
आपत्कालीन परिस्थितीत वायुसेना यांना बॅकअप धावपट्टी म्हणून वापरू शकते. लढाऊ विमाने उतरू आणि उड्डाण करू शकतात. केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठीच सुलतानपूरमध्ये ३.२ किमी लांबीची आपत्कालीन हवाई धावपट्टी तयार करण्यात आली आहे. एक्स्प्रेसवेमुळे लष्करी आणि रसद सामग्रीची वाहतूक खूप वेगाने करता येते. एअर शोच्या माध्यमातून पायलट आणि ग्राउंड क्रू युद्धाच्या परिस्थितीसाठी स्वत:ला तयार ठेवू शकतात.

