तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आणखी तीव्र रूप धारण केले असून आता इराणने ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-४’ सुरू केले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(आयआरजीसी) ने जड क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने संयुक्त अरब अमिरात, बहरीन आणि कुवैतमधील तीन अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने इराणच्या खार्ग बेटावर मोठया प्रमाणात हवाई हल्ले केले. या कारवाईत बेटावरील ९० पेक्षा जास्त लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये नेव्हल माइन स्टोरेज, क्षेपणास्त्र बंकर आणि इतर अनेक लष्करी सुविधा समाविष्ट होत्या. अमेरिकेने मात्र तेलाशी संबंधित पायाभूत सुविधा जाणूनबुजून वाचवल्या, असेही सांगण्यात आले. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीनुसार, खार्ग बेटावरील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून हल्ल्यानंतर काही वेळातच बेटावरील एअर डिफेन्स सिस्टम पुन्हा सक्रिय करण्यात आली. इराणने दावा केला की अमेरिकेचा हल्ला अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरला.
वरिष्ठ इराणी अधिकारी ठार
इस्रायली डिफेन्स फोर्सने तेहरानवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या खातम अल-अनबिया इमर्जन्सी कमांडचे दोन वरिष्ठ अधिकारी अब्दोल्लाह जलाली-नसब आणि अमीर शरीअत ठार झाल्याची माहिती दिली. इस्रायलने गेल्या २४ तासांत इराणच्या पश्चिम आणि मध्य भागातील २०० हून अधिक पायाभूत ठिकाणांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमध्ये बॅलिस्टिक मिसाइल लॉन्चर, एअर डिफेन्स सिस्टम, लॉन्च पॅड आणि शस्त्रसाठा केंद्रे यांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, या कारवाईचा उद्देश इराणची क्षेपणास्त्र क्षमता कमकुवत करणे हा आहे.
सौदी अरेबिया आणि यूएईवर ड्रोन-मिसाइल हल्ले
युद्धाचा प्रभाव आता खाडीतील इतर देशांवरही दिसू लागला आहे. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की शुक्रवारी रियाध आणि पूर्वेकडील भागात आलेले १० ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. संयुक्त अरब अमिरातमध्येही इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यूएईच्या एअर डिफेन्स सिस्टमने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अडवले. विविध भागांत ऐकू येणारे मोठे आवाज हे एअर डिफेन्स सिस्टमने बॅलिस्टिक मिसाइल रोखल्याचे आणि फायटर जेट्सने ड्रोन इंटरसेप्ट केल्याचे असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.
प्रदेशातील तणाव आणखी वाढला
सध्या युद्धात इराणकडून सातत्याने प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू आहेत, तर अमेरिका आणि इस्रायल इराणमधील लष्करी ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करून हवाई कारवाया करत आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. रम्यान, या संघर्षामुळे तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होत असून मध्यपूर्वेतील अस्थिरता अधिक वाढली आहे. सौदी अरेबिया आणि वअए सारखे खाडी देशही आता थेट या संघर्षाच्या प्रभावाखाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

