बीजिंग : चीन आणि फिलीपिन्स पुन्हा एकदा दक्षिण चीन समुद्रात आमनेसामने आले आहेत. गेल्या काही महिन्यांत या दोन्ही देशांत तणाव तीव्रतेने वाढला आहे. विशेष म्हणजे, फिलीपिन्सकडे आता भारतीय बनावटीचे ब्रम्होस सुपरसॉनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे, जे त्यांनी आपल्या किना-यांच्या संरक्षणासाठी तैनात केले आहे. परिणामी चीन आणि फिलीपिन्स यांच्यातील सागरी संघर्ष आता केवळ जहाजांच्या टक्करीपुरता मर्यादित राहिलेला नाही. फिलीपिन्सच्या आरोपांमुळे हा तणाव वाढला आहे.
चिनी नौदल आणि तटरक्षक दलाने अलीकडे फिलीपिन्सच्या नियमित रोटेशन आणि पुरवठा मोहिमेत अडथळा आणला, जी सेकंड थॉमस शोल येथे तैनात असलेल्या त्यांच्या सैन्याला अत्यावश्यक पुरवठा पोहोचवण्यासाठी होती असा फिलीपिन्सचा दावा आहे. चिनी जहाजांनी धोकादायकपणे त्यांचा मार्ग अडवल्यामुळे ही मोहीम तात्पुरती थांबवावी लागली असा आरोप त्यांनी केला.
दक्षिण चीन समुद्रातील काही भागांवर चीन आणि फिलिपिन्स यांच्यात दीर्घकाळापासून वाद आहे. या पार्श्वभूमीवर फिलिपिन्सने आपल्या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी भारताकडून ब्रम्होस मिसाइल प्रणाली घेतली आहे. २०२२ मध्ये दोन्ही देशांमध्ये सुमारे ३७.५ कोटी डॉलरचा करार झाला होता. फिलिपिन्सच्या लुझोन बेटाच्या उत्तर भागात ब्रम्होसशी संबंधित युनिट सक्रिय करण्यात आले आहे. या भागाचे भौगोलिक महत्त्व मोठे आहे. येथून दक्षिण चीन समुद्र तसेच तैवानच्या दिशेने लक्ष ठेवणे शक्य होते. याशिवाय पश्चिम लुझोनमध्येही ब्रम्होससाठी सुविधा उभारण्यात आली आहे.
चीनने दिली धमकी
फिलीपिन्स आमच्या प्रादेशिक सागरी हद्दीत सातत्याने चिथावणीखोर कारवाया करत आहे असा आरोप चीनचा आहे. फिलीपिन्स चिनी बेटे आणि प्रवाळ बेटांच्या आसपास आपल्या हालचाली वाढवत आहे आणि चिनी तटरक्षक दल त्यांना रोखण्यासाठी कारवाई करत राहील असे चीनचे सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सने रविवारी एका वृत्तात म्हटले आहे. बीजिंगने सेकंड थॉमस शोलवरील फिलीपिन्सच्या हजेरीलाही आव्हान दिले आहे. मानवतावादी गरजांसाठी काही पुरवठा मोहिमांना परवानगी दिली जाऊ शकते, परंतु फिलीपिन्सला तेथे नवीन कायमस्वरूपी संरचना मजबूत करण्याची किंवा बांधण्याची परवानगी दिली जाणार नाही असे चीनने स्पष्ट केले.
















