मुंबई : प्रतिनिधी
जुहूसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासाची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांच्या हाती या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे लागले असून रातोरात मुख्य आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. लवकरच या आरोपींना बेड्या ठोकल्या जातील. हे लोक महाराष्ट्राबाहेरून किंवा देशाबाहेरून सूत्रे हलवत आहेत. त्यामुळे इतर राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधून आणि केंद्र सरकारची मदत घेऊन या सर्वांचा पर्दाफाश केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-या विरोधकांचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला. विरोधकांनी टीका करण्यापूर्वी थोडे अंतर्मुख होऊन स्वत:च्या काळाकडे पाहावे. हे तेच लोक आहेत ज्यांच्या काळात पोलिसांच्या मदतीने देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला होता. मनसुख हिरेन यांची हत्या आणि सीबीआयने उघडकीस आणलेले बदल्यांमधील घोटाळे ते कदाचित विसरले असावेत, असा घणाघाती पलटवार त्यांनी केला. मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक असून ते या प्रकरणाच्या मुळाशी नक्की जातील, असेही ते म्हणाले.
लॉरेन्स बिश्नोई गँगला थेट इशारा
या गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याच्या चर्चेवरही फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. कोणतीही गँग असो किंवा व्यक्ती, कोणालाही सोडले जाणार नाही. धमक्या देऊन जर कोणी असे काम करत असेल, तर त्यांना कसे सरळ करायचे हे मुंबई पोलिसांना चांगलेच माहिती आहे.
















