लातूर : प्रतिनिधी
कायद्याचे पालन करणे हे केवळ कायदेशीर बंधन नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयाच्या नवीन सेमिनार हॉलच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. यावेळी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबईचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मंगेश पाटील,
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललितकुमार शहा, सचिव रमेश बियाणी, विशाल लाहोटी, अजिंक्य सोनवणे, संजय बोरा, अॅड. आशिष बाजपाई, अॅड. श्रीकांत उटगे, बार कौन्सिल ऑफ गोवा व महाराष्ट्राचे अॅड. जयंत जायभावे, अॅड. व्हि. डि. साळुंके, लातूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवकुमार जाधव, सचिव अॅड. गुरुप्रसाद येरटे, प्राचार्या डॉ. पूनम नाथानी उपस्थित होत्या.
भारतीय राज्यघटनेने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत. पण अधिकारांसोबत कर्तव्येही दिली आहेत. आपल्या अधिकारसोबतच आपण आपली कर्तव्ये पार पाडतो का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे सांगून ओक म्हणाले की, संविधान हा केवळ ग्रंथ नसून आपली जीवनशैली आहे. संविधान टिकवायचे असेल तर कायद्याचा आदर आणि पालन हाच एकमेव मार्ग आहे. सेमिनार हॉलच्या उद्घाटनाने विद्यार्थ्यांना संवाद, चर्चासत्र आणि कायदेशीर चर्चांसाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कारण वकील म्हणजे केवळ न्यायालयात युक्तिवाद करणारा नाही. तर तो समाजात न्याय आणि कायद्याचे भान जागवणारा सेतू आहे. यावेळी कुलगुरू डॉ. चासकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे महत्व अधोरेखित करताना वकिली व्यवसायासाठी आवश्यक प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. यावेळी पाटील म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने बोलायला का शिकले पाहिजे यावर भर दिला. कारण वकिली व्यवसायात संभाषण कौशल्य आवश्यक आहे. अॅड. बाजपाई यांनी ज्येष्ठ वकील बी. व्ही. कंकाळ यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून महाविद्यालयाचा भक्कम पाया रोवण्यात त्यांची भूमिका विशद केली.
यावेळी दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. वाय. शेख, न्यायाधीश अभय शिरशीकर, न्यायाधीश विकास कुलकर्णी, न्यायाधीश वेदपाठक जे, न्यायाधीश जे. के. जोशी, न्यायाधीश ए. आर. कुरेशी, न्यायाधीश एस. डी. जगताप, न्यायाधीश व्ही. जी. इंद्राळे, न्यायाधीश प्रदीप शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. पूनम नाथानी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी पांचाळ यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. गोपाळ पांचाळ यांनी केले. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
















