देवणी : बाळू तिपराळे
पावसाने पाठ फिरवल्याने देवणी तालुक्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असताना आता पशुधनाच्या चा-याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खरीप पिके हातची गेल्याने शेतक-यांसमोर आर्थिक संकट उभे आहे. त्यातच जनावरांसाठी चारा उपलब्ध होणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील ज्या ज्या गोष्टी चारा म्हणून वापरण्याजोगे आहे ते सर्व संकलीत करणे गरजेचे आहे. शासनाने चा-याच्या प्रश्नाचाही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे.
ऊस उत्पादकांकडील वाडे शासनाने चारा म्हणून योग्य दराने खरेदी करण्याची हमी द्यावी. शासनाने गावनिहाय मागणी आणि जनावरांची संख्या लक्षात घेऊन चारा खरेदीचे नियोजन केल्यास एकीकडे शेतक-यांना वाड्याचे उत्पन्न मिळेल, तर दुसरीकडे पशुपालकांना चारा उपलब्ध होईल. दुष्काळी परिस्थितीत ही दुहेरी मदत ठरू शकते.
दुष्काळाच्या काळात चारा छावण्या उभारण्यापेक्षा चारा थेट गरजू पशुपालकांच्या दावणीपर्यंत पोहोचविण्याची मागणी पुढे येत आहे. चारा छावण्यांच्या व्यवस्थापनात गैरव्यवहाराला वाव मिळू शकतो, अशी शेतकरी संघटनांची भूमिका आहे. छावण्यांमध्ये प्रत्यक्ष गरजू दुभती जनावरे आणि शेतीच्या कामासाठी आवश्यक बैल यांना लाभ मिळण्याऐवजी चुकीच्या नोंदीतील जनावरांना लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक गावातील जनावरांची प्रत्यक्ष नोंदणी करून त्यानुसार चारा खरेदीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जनावरांची संख्या निश्चित झाल्यानंतर थेट दावणीवर चारा पोहोचविण्याची व्यवस्था केल्यास खोट्या नोंदींना आळा बसेल आणि निधीचा योग्य लाभ गरजू पशुपालकांपर्यंत पोहोचू शकेल.
















