प्रमोद राऊत
धाराशिव : पोटाची खळगी भरण्यासाठी कलाकेंद्रात थिरकणारे पाय आता विसावले आहेत. काही गैरप्रकार घडल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व कलाकेंद्र शासनाने बंद केले आहेत. थिरकरणारे पाय विसावल्यामुळे कलाकेंद्रात काम करणा-या त्या महिलांच्या पोटा-पाण्याचा, रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वावलंबी बनवणार आहे, असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगितले.
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने व अन्य कारणांमुळे धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र पालकमंत्री प्रताप सरनाईक व जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुढाकार घेऊन बंद केले. परिणामी या कला केंद्रांत कार्यरत असलेल्या अनेक महिलांचा उपजीविकेचा आधार अचानक कोलमडल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या महिलांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले असून, त्यांचे कौशल्य, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि आवड लक्षात घेऊन योग्य त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच ग्रामीण विकास विभागाच्या विविध योजनांद्वारे या महिलांना मदत करण्यात येणार आहे. स्वयंरोजगारासाठी भांडवल, प्रशिक्षण तसेच बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक बळकटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शिवणकाम, ब्यूटी पार्लर, अन्न प्रक्रिया, लघुउद्योग यांसारख्या क्षेत्रांत प्रशिक्षण देऊन महिलांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
केवळ महिलांचाच नव्हे तर कला केंद्र चालकांचाही प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. या चालकांचेही पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी व्यवसायाच्या संधी शोधल्या जात असून, त्यांना शासकीय योजनांत सहभागी करून घेण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे या सर्व घटकांना एकत्रितपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी नमूद केले. प्रशासनाकडून संबंधित महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी समुपदेशन शिबिरेही आयोजित केली जाणार असून, महिलांना मानसिक आधार देण्यावरही भर दिला जात आहे.
स्वयंसेवी संस्थांच्या
माध्यमातून पुनर्वसन?
स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनेही पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न होत आहे. कला केंद्रे बंद करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करून शासनाने संवेदनशील भूमिका घेतली आहे. या महिलांचे जीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला.
—-
एकल महिलांच्या
मदतीसाठीही पुढाकार
एकल महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. लाडकी बहिण योजना, एकल पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण, दरमहा शिष्यवृत्ती आदी योजना राबविल्या जात आहेत. महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि ग्रामीण विकास विभागाच्या योजनांचा लाभ बंद पडलेल्या कला केंद्रांतील महिलांना दिला जाणार आहे. यासाठी शासन स्तरावरून पुढाकार घेतला जात आहे.
-कीर्ती किरण पुजार,
जिल्हाधिकारी, धाराशिव

