शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील अजनी बु. येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून दिवाळीनिमित्त प्रत्येक सभासदाला ५ किलो साखरेचे वाटप करण्यात आले. सणासुदीच्या काळात संस्थेने दिलेल्या या भेटीमुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हा. चेअरमन भरत सूर्यवंशी, गटसचिव विजय राजे आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. आर्थिक अडचणींच्या काळात सभासदांना दिलासा देणा-या या उपक्रमाचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी चेअरमन बालाजी शिंदे म्हणाले की, संस्थेचा विकास हा सभासदांच्या विश्वासामुळेच शक्य झाला आहे. सभासदांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील. सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था नेहमीच पुढाकार घेईल. यावेळी संचालक लक्ष्मण बोधले, रामेश्वर पाटील, अशोक चिमेगावे, उद्धव शिंदे, सरलाबाई मठपती, राजेंद्र शिंदे, सुधीर मादलापुरे, रंजनाबाई शिंदे, लक्ष्मण पाटील, मीनाबाई आदाटे, माधव कांबळे यांच्यासह गावातील ज्येष्ठ मंडळी व सभासद उपस्थित होते.
















