Homeमहाराष्ट्रपारा वाढला, राज्यात पुन्हा उष्णतेची लाट!

पारा वाढला, राज्यात पुन्हा उष्णतेची लाट!

मुंबई : प्रतिनिधी
दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषत: विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा ४१ अंशाच्या पुढे गेला आहे. दरम्यान, राज्यात पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उच्चांकी तापमान नोंदले गेले असून, पुढील काही दिवस तापमानाची पातळी आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अर्थात, पुढील ३ दिवसांत राज्यातील उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली.

अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान ४५.३ अंशाच्या पुढे आहे. सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान ४१ च्या पुढे आहे. नागरिकांनी पुढील ३ दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. पुढील ५ दिवसांत पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांत विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशाराही भारतीय हवामान विभागाने दिला. त्यातच विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, येत्या चार ते पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात विदर्भात पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. सध्या विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी होत चालल्याने उत्तरेकडील राज्यांतून गरम वारे वाहू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम विदर्भाच्या तापमानावर होत आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक भागांत पारा पुन्हा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

प्रचंड उकाड्याने
नागरिक त्रस्त
एप्रिल महिन्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काही दिवस वातावरणात थोडा दिलासा मिळाला. आता पुन्हा एकदा तापमान झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

विदर्भात पारा वाढला
नागपूरसह अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. कालपासूनच विदर्भात उष्णलाटेचा प्रभाव तीव्र झाल्याचे जाणवत असून, येत्या काही दिवसांत उकाडा आणखी वाढणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR